पाकिस्तानने दहशतवाद्यांना थारा दिल्यास अमेरिका शांत बसणार नाही

डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर या ठिकाणी त्यांनी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. 
गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या लांबलेल्या युद्ध मोहिमेविषयी काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आजच्या भाषणात त्यांनी यावर भाष्य केले. गेल्या १६ वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहे. अजूनही विजय मिळवता न आल्यामुळे अमेरिकन जनतेला या युद्धाचा कंटाळा आला आहे. परंतु, भूतकाळात अमेरिकन नेत्यांनी इराकमध्ये जी चूक केली ती आपल्याला पुन्हा करून चालणार नाही. अफगाणिस्तानमधून एका झटक्यात सैन्य माघारी घेतल्यास कदाचित न स्विकारता येण्याजोगे परिणाम पाहायला मिळू शकतात. या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. सप्टेंबर २०११ पूर्वी अशीच माघार घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आयसिस व अल कायदाने फायदा घेतला, असे ट्रम्प यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाचप्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे पाकिस्तानने आता दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे. पाकिस्तानी जनताही दहशतवादामुळे होरपळत आहे. मात्र, तरीही पाकिस्तानकडून दहशवाद्यांना आश्रय देण्याचा उद्योग सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, त्यांनी भविष्यात भारताशी असलेली धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्याचे संकेत दिले. मात्र, भारताने आम्हाला अफगाणिस्तानमध्ये आणखी सहकार्य करायला पाहिजे. अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारातून भारत अब्जावधी डॉलर्स कमावतो, त्याची परतफेड भारताने अफगाणिस्तानमध्ये करायला पाहिजे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.


Social Sharing

About us

Feed back

Careers

Advertise with us

Contact us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.