निखिल वागळेजी खा. उदयनराजेंची सरंजामी संज्ञांची मात्रा मिस्टर रामराजेंना लागू होईल काय ?

2018-01-08

निखिल वागळेजी खा. उदयनराजेंची सरंजामी संज्ञांची मात्रा मिस्टर रामराजेंना लागू होईल काय ?

 "सध्या भीमा कोरेगाव  या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

 परवा भिमा कोरेगाव घटनेनंतर सातार्‍याचे खासदार उदयनराजे यांची या विषयावर एका वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया घेण्यासाठी अती घाई केली होती. टीआरपीच्या नादात आपण काय दाखवतोय, याचे भान संबंधितांना ठेवता येत नाही. खा. उदयनराजे म्हणजे मोकळाढाकळा माणूस. जे पोटात तेच ओठावर. परंतू खा. उदयनराजेंच्या 35 टक्के या एका शब्दाने घात केला आणि उदयनराजेद्वेषींना हे आयते कोलित हातात मिळाले. यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी उदयनराजेंच्या 35 टक्के या विधानाचा खरपूस समाचार घेत उदयनराजेंना आजपासून व आत्तापासून मी छत्रपती खासदार उदयनराजे म्हणणार नाही, त्यांना फक्त खा. उदयन भोसले म्हणणार, असे जाहीर करुन टाकले.

 यासाठी आता थोडे पाठिमागे जावूया.....
सुमारे पाच ते सहा वर्षापूर्वी निखील वागळे आयबीएन लोकमत या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक होते. त्यावेळी त्या वृत्तवाहिनीचा टीआरपीही जोरात होता. त्यामुळे वागळेही जोमात होते. स्टुडिओमध्ये बोलावून दिसेल त्याला कसा वाकडा करुन त्याचा आकडा कसा करायचा, हा हातखंडा वागळेंनी चांगलाच आत्मसात केला होता. त्यामुळे राज्यातील भले-भले वागळेंना टरकून असत. दरम्यान त्याचवेळी वागळेंचे निकटवर्तीय पत्रकार युवराज मोहिते यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टिमध्ये कलमनामा हे ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यातील विश्‍वसनीय साप्ताहिक सुरु केले होते. 
कुठलेही साप्ताहिक अथवा दैनिक समाजमनात रुजविण्यासाठी त्याला काहीतरी प्लॅटफॉर्म हवा असतो. अखेर तो प्लॅटफॉर्म खा. उदयनराजेंच्या निमित्ताने साप्ताहिक कलमनामा ला मिळाला होता. प्रतापगड येथील भवानी देवी संस्थानची हजारो एकर जमीन महाबळेश्‍वर, वाई आणि जावली तालुक्यात आहे. ही जमीन शेकडो वर्षांपासून येथील स्थानिक भूमिपूत्र कसत आहे. ही जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांना खंडकरी म्हणून ओळखले जाते.

 ही सरंजामी जमीन कसून शेकडो वर्षापासून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असतानासुद्धा तो शेतकरी या जमिनीचा मालक ठरु शकत नाही. कारण जमिनीच्या सातबारामध्ये असणार्‍या इतर हक्कामध्ये प्रतापगड येथील भवानी देवी संस्थान व खा. उदयनराजे भोसले यांचे नाव आहे. त्यामुळे संबंधित खंडकरी ती जमीन विकू अथवा त्या जमिनीवर कर्ज काढू शकत नाही. हाच मुद्दा धरुन शिवसेना पुरस्कृत वसईचे तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी या विषयावरुन विधानसभा गाजवून राज्यभर हे रान पेटवले होते. 
हे पेटवलेले लोण सातार्‍यातही आले होते. कलमनामा आणि इंग्रजी साप्ताहिक आऊटलुक (मॅगझीन) यांनी हा विषय उचलून धरलेला होता. कलमनामा हे साप्ताहिक या विषयामुळे राज्यभरात चांगलेच बाळसे धरु लागले होते. त्यावेळी उदयनराजे या सर्व प्रकारामुळे एकटे पडलेले होते. स्वपक्षीय ही थारा देताना दिसून येत नव्हते. मुंबईतील आझाद मैदानापासून सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उदयनराजे विरोधी मोर्चाने रान तापवले गेले होते. 

त्यावेळी चर्चेसाठी वागळेंनी तत्कालीन आमदार विवेक पंडित, कलमनामाचे संपादक युवराज मोहिते यांना स्टुडिओमध्ये चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदविली गेली असेल. कारण त्या चर्चेमध्ये थेट सातारच्या छत्रपतींच्या थोरल्या गादीवरच हल्ला चढविण्यात आला होता. 14 आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील सर्व शाह्या, राजे-रजवाडे, संस्थाने खालसा करण्यात आली. पाकिस्तानचे माहित नाही. परंतू स्वतंत्र भारतामध्ये संस्थानिक, राजे-रजवाडे हे सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगतील अशी आशा बाळगण्यात आली. परंतू संस्थानिक, राजे-रजवाडे चतुर निघाले. सुंभ जळेल, पण पीळ सुटणार नाही अशा पद्धतीने या संस्थानिक, राजे-रजवाड्यांनी आपला वकुब तसाच ठेवला.

 महाराष्ट्राचे थोर सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या राजे-रजवाडे, संस्थानिकांना राजकारणात कधीही येवू दिले नाही. बहुजन समाजातील अनेक कर्तबगार मुले मात्र त्यांनी राजकारणात आणून त्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. प्रसंगी सातारा छत्रपतींच्या गादीच्या राजमाता सुमित्राराजे यांच्याही उमेदवारीला त्यांनी कडाडून विरोध केला. फलटणमध्ये तत्कालीन फलटण संस्थानचे अधिपती मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचा स्व. कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी लाजिरवाणा पराभव केला. त्यानंतर माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी या फलटणच्या राजांना सुमारे साडेतीन दशके फलटणकडे फिरकूही दिले नाही. परंतू फलटणमधील काही राजधार्जिन्या लोकांनी ही 'ब्याद' 1991 साली फलटणच्या राजकारणात आणली आणि ही 'ब्याद' 1991 पासून आजतागायत फलटणकरांच्या मानगुटीवर बसून सरंजामशाही ही चीज काय असते, याची पदोपदी जाणीव फलटणकरांना करुन देत आहे.

 ज्या यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करायला लावले, त्या यशवंतराव चव्हाण व त्यांची धर्मपत्नी वेणुताई चव्हाण यांचा महाराष्ट्रातील पहिला संयुक्त पुतळा फलटण येथील जिंती नाक्यावर आहे. यशवंतप्रेमींमध्ये स्फुल्लिंग चेतवणारा हा पुतळा फलटणच्या राजे लोकांनी अक्षरश: अडगळीमध्ये टाकला आहे. याठिकाणी फिरस्ती कुत्री, डुकरे, गाढवे बिनदिक्कतपणे वावरताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी दिवसादिवशीसुद्धा या राजे लोकांनी या पुतळ्याला साधे हार घालण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही. त्यामुळे 'बदला' काय चीज असते, याचे उत्तम उदाहरण फलटणच्या राजे लोकांनी या माध्यमातून दाखवून दिले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात राहून फलटणची सत्ता उपभोगणारे फलटण नरेश मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचा तोंडी लावण्यापुरते यशवंत प्रेम काय कामाचे?

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि पुण्यात कृषी आयुक्त पदावर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी पत्रव्यवहार, संचिका आणि मोबाईल मॅसेजमध्ये नावाच्या अगोदर सर, माननीय, साहेब, श्री अशा विशेष व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणार्‍या संज्ञा वापरण्यात येवू नयेत, असे परिपत्रक काढून राज्यातील राजे-रजवाडे व संस्थानिकांचे थोबाड फोडले होते. सुनिल केंद्रेकर यांच्या या भूमिकेचे राज्यभरात कौतुक झाले होते. परंतू लुटूपुटूची लढाई सुद्धा हरणार्‍या महाराष्ट्रातील संस्थानिकांनी सुनिल केंद्रेकरांचा कोणताही आदर्श न घेता आपले घोडे पुढे दामटलेच आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास फलटण, औंध संस्थानामध्ये लोकांना मुजरा घालण्यासाठी सक्ती केली जाते. जो मुजरा घालत नाही, त्याला त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याची जागा दाखविली जाते.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंनी सरंजामशाही संज्ञांविरोधात उपस्थित केलेला मुद्दा रास्त आहे. सातार्‍यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार विवेक पंडीत यांनी खा. उदयनराजे यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चात खा. उदयनराजे स्वत: सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी मला उदयनराजे.. म्हणा, उदयन.. म्हणा किंवा उद्या.. म्हणा असे म्हणत मी सामान्य लोकांमध्ये वाढलो आहे, त्यामुळे या विशेष संज्ञांनी मला काही फरक पडत नाही. त्यामुळे मी लोकांच्या मनातील राजा आहे. त्यामुळे मला लोकांच्या मनातून कोणीही काढू शकत नाही, असे आव्हान केले होते. उदयनराजेंच्या या पवित्र्यामुळे त्यावेळी आंदोलकच उदयनराजेंच्या प्रेमात पडले होते.

राज्यातील वरिष्ठ सभागृह समजल्या जाणार्‍या विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटण संस्थानचे अधिपती समजले जातात. वंशपरंपरागत चालून आलेली राजेपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. राज्यात उच्च विद्याविभुषीत, सुसंस्कृत, अशी मिस्टर रामराजेंची ओळख आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांचा सर्वात लाडावलेला कार्यकर्ता म्हणून मिस्टर रामराजेंकडे बघितले जाते. परंतू राज्याला परिचित असणारा हा चेहरा फलटणमध्ये मात्र वेगळाच आहे. हे निखिल वागळेंना आजपर्यंत दिसले नाही. फलटणमध्ये सरंजामी वकुब काय असतो, हे अनुभवण्यासाठी निखिल वागळे यांनी वेषांतर करुन फलटणमध्ये काही दिवस राहिल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येईलच. त्यामुळे सरंजाम संज्ञांची मात्रा खा. उदयनराजेंपुरती लागू न राहता ती मात्रा मिस्टर रामराजेंनाही लागू होईल काय? याचा अभ्यास निखिल वागळेंनी जरुर करावा व ज्याप्रमाणे खा. उदयनराजे आ. पंडितांबरोबर वागले त्या पद्धतीने फलटण नरेश तुमच्याशी  वागतील काय? हे बघणे महाराष्ट्रातील जनतेसाठी औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे निखील वागळेजी "क्या रखा है, मुंबई और दिल्ली में कुछ दिन तो गुजारिए फलटण में !"
 

- संग्राम निकाळजे

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.