सातारा: "सुखाच्या चिरंतन ओढीपोटी माणसाला जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी अधिक महत्त्वाची वाटते, परंतू अधिक सूख सुद्धा माणसाला कधीकधी मानवत नाही. सुखाच्या सारीपाटावर भूतकाळाची गडद छाया पसरु लागताच जन्मभूमीच्या दिशेने उलटप्रवास सुरु होतो. माणूस हा प्राणीच मुळात भूतकाळाच्या कुंचल्याने वर्तमानातील चित्र रेखाटत असतो. भल्याभल्यांनी मातृभूमीच्या ओढीपोटी वर्तमानातील सुखाच्या साम्राज्याचा त्याग केला आहे.
त्याला उत्तर ध्रुवावरील निलाक्षी किंवा दक्षिण ध्रुवावरील सरु तरी कसे अपवाद असणार? कोणी कोणाच्या घरात जन्माला यावे, हे कोणाच्याच हातात नसते. परंतू आयुष्याला आकार कोठे द्यावा, हे मात्र ज्याच्या-त्याच्या हातात असते. जन्मदात्यांनी जन्म दिला, त्यांचे कर्तव्य पूर्ण केले, परंतू याच जगात अन्न-वस्त्र-निवारा या तीन गोष्टींबरोबरच जगण्यासाठी माणुसकी नावाची गोष्टसुद्धा तितकीच आवश्यक आहे. अन् या माणुसकीनेच सातासमुद्रापार असणारे बंध जोडण्याचे काम केले आहे. ही गोष्ट आहे सरु बेअर्ली आणि निलाक्षी एलिझाबेथ यांची. मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील गणेश तलाय या भागात 1981 साली जन्मलेल्या शेरु मुन्शी खान आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वरुड येथील कर्जबाजारी होवून आत्महत्या केलेल्या शेतकर्याची मुलगी निलाक्षीची.
निलाक्षी उत्तरध्रुवावरच्या स्वीडन देशात दत्तक गेली, तर सरु हा दक्षिण ध्रुवावरील ऑस्ट्रेलियाजवळच्या तस्मानिया हॉबर्ट येथे. दोघेही एकमेकां परस्परांच्या विरोधी जागेवर जावून विसावले. परंतू जसजसे वय वाढत गेले, तसतशी स्वत:बाबत जाणून घेण्याची जिज्ञासा वाढीस लागली. मी कोण? मी कोठली? मी कोठून आलो? हे प्रश्न या दोघांच्याही मनात किशोरवयातच रुंजी घालू लागले. आणि इथून पुढेच सुरु झाला रक्तांच्या नात्यांचा शोध.
जून 2013 साली 'अ लॉंग वे होम' या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीचा उच्चांक गाठला. सरु बिअर्ली याने आपले भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास या पुस्तकामध्ये चितारला आहे. अशक्यप्राय गोष्ट जेव्हा शक्यप्राय होवून बसते, तेव्हा तो जागतिक उच्चांक होतो. अशाच उच्चांकाला जगभरातील वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आणि त्याचवेळी खर्या अर्थाने जगाला सरु बिअर्ली अर्थात शेरु मुन्शी खान समजला. 2016 साली प्रदर्शित झालेला लायन या चित्रपटाने तब्बल 6 ऍकॅडमी ऍवार्ड्स जिंकले आणि जगाला सरु बिअर्ली माहित झाला. 2013 साली अ लॉंग वे होम या प्रकाशित झालेल्या पुस्तकावर गार्थ डेव्हिस यांनी लायन हा चित्रपट काढला. या इंडो-ऑस्ट्रेलियन चित्रपटाने चित्रसृष्टीतील अनेक विक्रम मोडित काढले.
1981 साली मध्यप्रदेशातील खांडव्यातील गणेश तलाय भागात शेरु मुन्शी खानचा जन्म झाला. जन्मत:च वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईने काबाडकष्ट करुन सरुसह तीन भावंडांना जगविण्याचे काम केले. घरी अठरा विश्व दारिद्य्र. त्यामुळे सरुचा मोठा भाऊ गुड्डू बरोबर सरु पाच वर्षाचा असताना खांडव्यातील रेल्वेस्थानकावर भीक मागण्यासाठी जात होता. एक दिवस भीक मागण्यास गेला असता, मोठा भाऊ गुड्डू शेरुला रेल्वेस्टेशनवर बसवून भीक मागण्यासाठी गेला. भुकेने व्याकुळ झालेला सुरु अन्नाच्या शोधात कलकत्त्याला जाणार्या रेल्वेच्या लगेज बोगीमध्ये जावून कधी पोहोचला ते त्याचे त्यालाच कळाले नाही. भुकेच्या व्याकुळतेमुळे तो त्याठिकाणीच झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर आपण कोणत्यातरी वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असल्याची जाणीव झाल्यानंतर आपल्या आई व भावाला आर्त हाकेने त्याने आवाज दिले. परंतू वेगाने धावणार्या रेल्वे व्यतिरिक्त त्याचा आवाज त्या खडखडाटामध्ये विरुन जातो. सुमारे तीन दिवसांच्या प्रवासानंतर ती रेल्वे कलकत्त्यातील हावडा रेल्वेस्थानकावर पोहोचते. त्यानंतर तो इवलासा जीव कलकत्त्यासारख्या महानगरामध्ये भूक शमविण्यासाठी अन्न शोधू लागतो. फलाटावर पडलेले खराब झालेले अन्न खावून अम्मी, गुड्डू म्हणून आपल्या आई, भावाला शोधण्यासाठी आवाज देवू लागतो. परंतू रेल्वेच्या गतीने पळणारी कलकत्त्यातील माणुसकीही त्याला आधार देत नाही. मानवी तस्करी करणार्या टोळक्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेवून तो समाजसेवकांच्या हाती लागतो. तेथून पुढे त्याची रवानगी अनाथालयात होते. त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियन दाम्पत्य दत्तक मूल घेण्यासाठी कलकत्त्यातील अनाथालयाचे उंबरे झिजवत असते. परंतू त्यांना हवे तसे मूल मिळत नव्हते. शेवटी एका अनाथालयामध्ये सरु त्यांच्या दृष्टीस पडतो. आणि सरु त्यांना चटकन पसंदही पडतो. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर सरु ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार होतो.
तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये सरु शिक्षण घेत लहानाचा मोठा होत असतो. आपले नवीन आई-वडील पोटच्या पोराप्रमाणे सरुचा सांभाळ करीत असतात. किशोरवयात येत असतानाच गणेश तलाय, अम्मी, गुड्डू यांच्या आठवणींने सरु व्याकुळ झालेला असतो. महाविद्यालयीन शिक्षण संपविल्यानंतर सरु आपल्या भारतातील आईच्या आणि भावाच्या शोधासाठी गुगलच्या माध्यमातून शोध मोहीम हाती घेतो. कलकत्त्यापासून तीन दिवसांच्या अंतरापर्यंतची अनेक रेल्वेस्थानके शोधल्यानंतर खांडवा येथे त्याच्या जुन्या आठवणींनुसार त्याचा शोध संपतो. खांडवा हेच आपले जन्मस्थान आहे, हे मानून सरु बिअर्ली भारताकडे प्रस्थान करतो. खांडव्यात आल्यानंतर लहानपणीच्या त्याच्या आठवणी ताज्या होतात. ज्या गल्लीबोळामध्ये त्याने आपले बालपण घालवले होते, त्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागतात. तो त्याच्या लहानपणीच्या घराजवळ जावून पोहोचतो. परंतू ते घर पूर्णपणे मोडकळीस येऊन खंडहर झालेले असते. ते पाहून त्याच्या काळजात धस्स होते. भाषेची अडचण असल्यामुळे तो स्थानिकांना याबाबत विचारणा करु लागतो. परंतू इंग्रजीमधून विचारलेल्या प्रश्नांना हिंदीमधून उत्तरे मिळत असल्यामुळे तो पुरता हतबल होतो. शेवटी इंग्रजीची जाण असलेला एक माणूस शेवटी सरुला त्याच्या आईच्या घरापर्यंत आणून सोडतो.
तब्बल 28 वर्षानंतर आलेल्या आपल्या मुलाला बघून आईच्या डोळ्यातून अक्षरश: आनंदाश्रू वाहू लागतात. नक्की काय चालू आहे, ते उपस्थितांपैकी कोणालाच समजत नाही. त्यावेळी सरु गुड्डू या आपल्या मोठ्या भावाबाबत विचारणा करतो. परंतू सरु हरविल्यानंतर केवळ दोनच वर्षात गुड्डूचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. हे समजताच सरुला रडू कोसळते. 28 वर्षानंतर मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणार्या एका अभागी मातेला आपला हरवलेला मुलगा गवसतो. हे स्वप्न नाही तर काय? अशक्यातील अशक्य गोष्टी शक्यप्राय झाल्यानंतर गगनही ठेंगणे होते, याची प्रचिती सरु बिअर्लीच्या शोधातून येते.
दुसर्या प्रकरणात यवतमाळमधील वरुड येथील एका शेतकर्याने 1973 साली कर्जबाजारी होवून आत्महत्त्या केली. सहा महिन्याची गर्भवती असलेली पत्नीने नंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतू मुलीच्या आईला दुसरे लग्न करावयाचे असल्याने नियोजित वराने संबंधित लहान मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने त्या विवाहितेच्या वडिलांनी त्या मुलीला पुण्यातील एका अनाथालयात पालनपोषणासाठी दिले. कालांतराने स्वीडनचे एक दाम्पत्य मुलगी दत्तक घेण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी स्वीडनच्या या दाम्पत्याने संबंधित अडीच वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. तिथून पुढे तिचा स्वीडनमधील प्रवास सुरु झाला. निलाक्षी एलिझाबेथ हे नवीन नाव, नवी ओळख तिला स्वीडनमध्ये मिळाली. परंतू 13 वर्षाची झाल्यानंतर आपले जन्मदाते खरे आईवडिल कोण, हा प्रश्नही तिला सतावत राहिला. परंतू शिक्षण घेत असल्यामुळे तिला तिच्या पालकांनी योग्य वेळ आल्यानंतर तुझ्या खर्या आईवडिलांना आपण भेटू या, हा शब्द दिला. परंतू आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत, आपला रंग वेगळा आहे, या मानसिक छळाचा तिला उबग आला होता. तेथून निलाक्षीने आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधात तिच्या स्वीडनमधील आईवडिलांनीही मोलाची साथ दिली. ज्या अनाथालयातून दत्तक घेण्यात आले होते. त्या अनाथालयाशी संपर्क करण्यात आला. शेवटी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या चाईल्ड अगेन्स्ट ट्राफिकिंगच्या ऍड. अंजली पवार व जर्मनीत वास्तव्यास असणारे अरूण डोल यांच्या माध्यमातून निलाक्षी एलिझाबेथ हिने आपल्या खर्या आईचा शोध घेतलाच. सुमारे 27 वर्षानंतर मृत्यूशय्येवर असणार्या आपल्या आईला भेटण्यासाठी निलाक्षी एलिझाबेथ यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात पोहोचली. आपल्यापासून दुरावलेली आपली मुलगी पाहून त्या मातेच्या डोळ्यात अश्रू तरळले. लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार, ऍड. अंजली पवार आणि अरुण डोल यांच्यामुळेच सुमारे 27 वर्षे दुरावलेल्या या मायलेकींची हृद्यभेट झाली. दोघींची डीएनए चाचणी करण्यात आली असता या दोघी मायलेकी असल्याचे सिद्ध झाले आहे. 6 जून2017 रोजी घडलेली ही घटना निलाक्षी एलिझाबेथच्या आयुष्यात एक सुवर्णक्षण म्हणून नोंद झालेली आहे.
सरु बिअर्ली आणि निलाक्षी एलिझाबेथ या दोघांच्याही आयुष्यामध्ये अशक्यप्राय गोष्टी शक्यप्राय झाल्या आहेत. माणुसकीच्या बंधनाच्या घट्ट गाठी जेव्हा आयुष्याला बसतात, तेव्हा आयुष्य समुद्राच्या भरतीप्रमाणे उसळी मारुन किनार्याला धडकत असते. परंतू या भरतीला रक्ताच्या नात्यांची ओहोटीही स्वस्थ बसू देत नाही. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव हे परस्पर विरोधी आहेत. परंतू सरु आणि एलिझाबेथच्या आयुष्याच्या प्रवासावरुन हे दोन्हीही ध्रुव आज एक झालेले आहेत. दोघांनाही रक्ताच्या नात्याचे आप्त गवसले आहेत. या परमोच्च आनंदापेक्षा जगातील कोणतीही गोष्ट यापुढे फिकी आहे.
-संग्राम निकाळजे
www.sataratoday.com